इतिहास
श्री क्षेत्र मढीची थोडक्यात इतिहास
मौजे मढी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथे ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधी मंदिर असून मंदिराची संपूर्ण देखभाल श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देव ट्रस्ट मढी (रजि. नंबर ई-८९/१९५४) या नंबरने नोंदणीकृत आहे.
सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत या रांगामध्ये गर्भगिरी पर्वतरांग अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. हा परिसर निसर्गरम्य असून गर्भागिरीच्या पर्वत रांगेत खळखळ वाहणाऱ्या पौनागिरी नदी शेजारी उंच टेकडीकाठी सुंदर असे मढी गाव आहे व अशा या पवित्र आणि मंगल गावात उंच टेकडीवर ब्रम्हचैतन्य कानिफनाथ महाराजांनी श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे सर्व देवीदेवतांच्या महायज्ञामध्ये ठरल्याप्रमाणे १० व्या शतकात फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली.
श्री ऋषभदेवाच्या शंभर मुलापैंकी नऊ मुले सिद्ध योगी होते. त्यांनाच नवनारायण असे म्हणतात. श्रीमद्भागवतात यांचे वर्णन आलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी व्दापारयुगाच्या शेवटी व्दारकेत नवनारायणांना आमंञित केले.व कलीयुगात कलीच्या प्रादूर्भावामुळे धर्माची हानी होईल व त्यासाठी भागवत धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी व नाथसंप्रदयाच्या उदयासाठी श्री नवनारायणांनी नवनाथ अवतार घेण्यास सांगितले.पूर्वसंकेता प्रमाणे नवनारायणां पैकी श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात एका भव्य निद्रिस्त हत्तीच्या कानातुन बालयोगी श्री कानिफनाथ महाराज अवतरीत झाले.त्यांचा जन्म हा हत्तीच्या कानातुन झाला म्हणुन त्यांचे गुरु जालिंदरनाथांनी त्यांचे "कानिफनाथ" असे नामकरण केले.श्री जालिंदरनाथांनी त्यांना सर्व देवीदेवतांचे आशिर्वाद मिळवून दिले. व त्यांना सर्व शास्ञे ,६४ कला, विद्या संपन्न केले. त्यानंतर श्री कानिफनाथांनी बद्रिकेदार येथे १२ वर्ष कठोर तपश्चर्या केली. सर्व देवीदेवतांना प्रसन्न करुन जनकल्याणासाठी ६ कोटी ८ लक्ष शाबरी मंञ विद्येची निर्मिती केली.देशभर पायी तिर्थयाञा केली.ज्या ज्या ठिकानी नाथ जात असत तिथे दुःखी कष्टी लोकांना मार्गदर्शन करत दीन-दलितांचे दुःख दूर केले.आपल्या वाणीने भक्तीमार्ग वाढविला.नाथांचे तेजोमय कार्य व प्रेमळ स्वभावामुळे अनेक भक्तांनी त्यांचा अनुग्रह घेतला. गावोगावी नाथसंप्रदयाची पताका फडकली.त्याकाळी श्रीकानिफनाथांचे सर्वाधिक ७०० शिष्य होते. त्यापैकी ९ शिष्यांची ८४ सिंद्धामधे गणना केली जाते.योग व भक्ती मार्ग यांची सांगड बांधत नाथांचे कार्य सुरु होते.स्ञीराज्यासह अनेक देशात नाथांनी प्रवास केला.नवनाथांपैकी श्री कानिफनाथ महाराज राजयोगी होते.नाथांच्या राजयोगाचे व कार्याचे वर्णन श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथात आलेले आहे.आपले गुरु जालिंदरनाथांना अश्वलिदेतुन चतुराईने मुक्त करुण त्यांच्या क्रोधापासुन गोपीचंद राजाचे रक्षण केले व गुरुंकडुन त्यांना नाथसंप्रदयाची दिक्षा देवुन नाथसंप्रदाय वाढविला.
श्री कानिफनाथांना कान्होबा, कृष्णपाद, कनेरी, कन्हैया अश्या विविध नावाने ओळखले जाते.नाथपंथातील श्रेष्ठ आचार्य व महान कवी होते.त्यांनी सुमारे ८७ ग्रंथाची निर्मिती केली असुन त्यापैकी ५७ ग्रंथ पाली भाषेत लिहलेले आहेत. नाथमहाराज नाथसंप्रदायाचा प्रचार-प्रसाराचे कार्य करत दहाव्या शतकात महाराष्ट्रात आले.महाराष्ट्रात अनेक ठिकानी त्यांनी वास्तव्य केले. बीड - पाथर्डी - अहिल्यानगर येथे गर्भागिरी पर्वत रांगा पसरलेल्या असुन हा परिसर नवनाथांना प्रिय आहे.हा गर्भागिरी डोंगर श्री गोरक्षनाथांनी आपल्या दिव्यशक्तिने सोन्याचा केला होता.तसेच याच परिसरातील श्री क्षेञ वृद्धेश्वर येथे श्री नवनाथांनी भव्य यज्ञ व भंडारा केला होता.व त्यासाठी तेहतीस कोटी देवी-देवता,अनेक दिव्य ऋषी -मुनी संत-महंत आले होते. या यज्ञ समारंभाच्या वेळी ठरल्या प्रमाणे श्री कानिफनाथ महाराजांनी श्री क्षेञ मढी येथे एका उंच टेकडी वर ज्यास गुलाब किंवा मर्दानी टेकडी असे म्हणतात येथे शके १०१० रोजी फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली.त्यानंतर दरवर्षी येथे भव्य याञोत्सव साजरा होवू लागला. श्री क्षेञ कानिफनाथ गड मढी येथे ऐतिहासिक परंपरा असुन अनेक राजघराण्याचा संबध नाथांशी होता. महाराणी येसुबाईंनी बाळराजे शाहु महाराज यांची औरंगजेबच्या कैदेतुन ५ दिवसात सुटका झाली तर मंदिराचा जिर्णोद्धार करील व पितळी घोडा ,नंदादिप अर्पण करील असा श्री कानिफनाथास नवस केला होता.श्री कानिफनाथ महाराज राणीच्या हाकेला धावले व बाळराजेंची पाच दिवसाच्या आतच सुटका झाली. महाराणी येसुबाईंनी बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड व त्यांचे कारभारी चिमाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे मंदिर बांधले.मंदिराचे बांधकाम एका किल्ल्याप्रमाणे असुन यास तीन प्रवेशव्दार आहेत. नगार खाना, बारदरी, नाथ समाधी मंदिर, ध्यान मंदिराचे बांधकाम व डाळींब ओटा असे भव्य मंदिराचे बांधकाम केले.साधारण शके १६५२ रोजी बांधकाम पूर्ण झाले.असे शिलालेख मंदिरात सापडतात.चिमाजी सावंत यांनी लिहलेला मराठी शिलालेख नाथांच्या समाधी मंदिरा समोर असुन यात मढीला व्दारका नगरीची उपमा दिलेली आहे. नाथांच्या समाधीची वैदिक पुजा व्हावी यासाठी छञपती शाहु महाराजांनी दिलेले सनद देवस्थानकडे आजही पहावयास मिळते.तसेच सरदार पिलाजी गायकवाड यांनी अर्पण केलेला पितळी घोडा मंदिरात दर्शनासाठी ठेवलेला आहे.
भाविकांना स्नानासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणुन बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड व त्यांचे कारभार चिमाजी सावंत यांनी ३ बारवेचे निर्माण केले होते व त्यांचे बांधकाम शके १६५५ रोजी झाले आहे असा उल्लेख गौतमी बारवेत कोरलेल्या शिलालेखात आढळतो.येथे एकदंर तीन बारव आहेत.छञपती शिवाजी महाराज यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या आईंनी मला पुञ झाला तर मंदिरात नंदादीप अर्पण करुण तुझे नाव माझ्या मुलाला ठेवीन.असा नवस केला त्यामुळे त्यांचे कान्होजी असे नाव ठेवले.असे ऐतिहासिक पुरावे येथे पहावयास मिळतात.
श्री नाथांच्या गडाच्या भव्य बांधकामास अठरापगड जाती-धर्माच्या लोकांनी हातभार लावला. त्यामुळे येथे याञेत त्यांना विविध मानपान दिला जातो.मढीला भटक्यांची पंढरी असेही म्हटले जाते.येथे काही वर्षापूर्वी नाथांना सर्वोच्च साक्षी मानुन जातपंचायत देखील भरली जात असे. तसेच रंगपंचमीला प्रसिद्ध असा गाढवांचा बाजार भरला जातो.
होळी ते गुढीपाडवा असा १५ दिवस भव्य याञोत्सव साजरा होतो.त्यातील फाल्गुन वद्य रंगपचंमी हा नाथांचा संजीवनी समाधी दिवस असल्याने लाखों भाविक येथे नाथांच्या दर्शनासाठी येतात.हजारो मानाच्या काठ्या वाजत-गाजत शिखराला लावतात.फाल्गुन वद्य अमावस्येला नाथप्रगट दिन उत्सव व फुलोरबाग याञेच्या दिवशी समाधीला श्री क्षेञ पैठण येथुन आणलेल्या कावडीचे गंगास्नान होते.व गुढीपाडव्यास नाथांच्या समाधीला मळी ( चंदनाचा लेप लावुन ) महापुजा केली जाते.यासह श्रावणी शुक्रवारी छबिना उत्सव साजरा होतो. गुरुपोर्णिमा,दत्तजयंती,दर अमावस्या,गुरुवार -शुक्रवार-रविवारी हजारो भाविक नाथांच्या दर्शनासाठी येतात. नाथांच्या मळीचे विशेष महत्व असुन भाविक नाथांचे सिद्ध तावीज पुजाऱ्यांकडुन भरुन देवघरात त्याची नित्य पुजा करतात.गडावर श्री नवनाथ मंदिरात भाविक श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतात.श्री चैतन्य कानिफनाथांची मढी येथे जागृत संजीवनी समाधी असुन लाखों भाविकांना येथे दिव्य अनुभुती आलेली आहे.आपणही नाथदर्शनासह येथे नवनाथ पारायण अभिषेक महापुजा सेवेचा लाभ घेवू शकता.देवस्थानच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी,भक्तनिवास, अन्नछञालय,दर्शनबारी, मिनीबस, वाहनतळ ईत्यादी सुविधा दिल्या जातात
चैतन्य कानिफनाथ महाराजांनी आपली समग्र हयात दीन दलितांच्या, भटक्या आणि निमभटक्यांच्या जीव ब्रह्मसेवेत घालवली त्यामुळेच चैतन्य श्री कानिफनाथ आखिल भारतीय भटक्या आणि निमभटक्या जाती जमातीचे आराध्य दैवत बनले आहेत तसेच या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी बलशाली अशा गोपाळ समाजाने मोठमोठी दगडे वाहून आणली कैकाडी समाजाने बांबुची टोपली तयार केली, घिसाडी समाजाने लोखंडी काम केले, बेलदार समाजाने नक्षीकाम केले, कोल्हाटी समाजाने कसरत दाखवून उंच अशा ठिकाणी बुरुज बांधण्यास मदत केली अशा प्रकारे वैदु, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, कुंभार, वडारी अशा अठरा पगड जाती जमातींनी मिळून मंदिर बांधकामास मदत केल्यामुळे प्रत्येक यात्रेत वर्षभर भारतभर भटकणाऱ्या या सर्व जातीजमातींच्या मंडळीना मानाप्रमाणे शिखरांना काठ्या लावण्याचे मान दिलेले आहेत. आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राला भटक्यांची पंढरी या नावाने ओळखले जाते. त्याचप्रमाणे त्यांचे विकोपास गेलेले तंटे याठिकाणी जात पंचायतीद्वारे श्री कानिफनाथ महाराजांना साक्षी मानुन मिटवले जातात त्यामुळे हे तीर्थक्षेत्र त्यांचे सर्वोच्च न्यायालय समजले जाते.
मढी येथील गाढवांचा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. रंगपंचमीला हा बाजार भरतो व या ठिकाणी कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशातून गाढवे विक्रीसाठी येतात आणि गाढवांना आकर्षक रंगवले जाते त्यामुळे त्यांचे मुल्य दहा हजारापासून ते एक लाखापर्यंत पोहोचते.
चैतन्य कानिफनाथ महाराज भ्रमण अवस्थेत असताना डालीबाई या महिला शिष्येने नाथ संप्रदायामध्ये सामील होण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार श्री कानिफनाथ महाराजांनी सांगितलेली खडतर तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर श्री कानिफनाथ महाराजांचा शोध घेत श्री क्षेत्र मढी येथे आली असता महाराजांनी समाधी घेतल्याचा शोध करत असतानाच फाल्गुन अमावस्येला श्री कानिफनाथ महाराज तिच्या दर्शनासाठी पुन्हा प्रकट झाले. महाराजांनी समाधी घेतल्याचे कळताच तिने डोके आपटुन जीव देण्याचे ठरवले तिची भक्ती पाहुन नाथ तिच्यावर प्रसन्न झाले व प्रगट होऊन तिला दर्शन दिले व आशिर्वाद दिला कि जे नाथभक्त तुझ्या समोर ईच्छा प्रगट करतील ती मी पूर्ण करील. तेव्हा पासुन पासून फाल्गुन अमावस्या हा प्रकटदिन सोहळा साजरा केला जातो व गुढीपाडव्याला महापूजा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व जाती धर्माचे नाथभक्त सामील होतात.
येथील पंधरा दिवसांच्या यात्रा काळात १५ ते २० लाख भाविक तसेच प्रती अमावस्येला ०४ ते ०५ लाख भाविक संपूर्ण भारतभरातून दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते शिवाय २०० ते २५० भाविक येथे सतत अनुष्ठानाला बसलेले असतात.
मढी सभोवतालचा गर्भगीरीचा पर्वत परिसर नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला असून या भागातच वृद्धेश्वराचे मंदिर असून नवनाथांनी त्याठिकाणी यज्ञ व भंडारा केल्याचा इतिहास आहे. या परिसरात अनेक नैसर्गिक धबधबे व दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वन औषधींचा खजीना आहे म्हणून येथे पर्यटनाला मोठा वाव आहे.
श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान हे मुंबई ते विशाखापट्टणम राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ६१ वरील तिसगाव पासून ०५ किमी व निवडूंगे बस थांब्यापासून ३ कि.मि. अंतरावर असून श्री क्षेत्र मढी येथून श्री मच्छिंद्रनाथ गड, देवीचे धामणगाव, वृद्धेश्वर मंदिर व मोहटादेवी गड हे सर्व तीर्थक्षेत्र पंतप्रधान सडक योजनेतून जोडली गेलेली आहेत.