पर्यटनस्थळविषयक माहिती
पर्यटकांसाठी विशेष आकर्षक माहिती –
गादीघर – समाधी मंदिराच्या दक्षिण बाजूला नाथांचे विश्रांती ठिकाण आहे. श्री कानिफनाथ महाराज शेज आरतीनंतर शेज घरात विश्रांती साठी जातात त्यासाठी गादीघरामध्ये नाथांचा पलंग असून गादीघरापुढे दगडावर कोरीव नागफण्यांचे सिंहासन आहे.
आद्यशिष्य मंदिर - श्री कानिफनाथ महाराज समाधी घेतेवेळी त्यांचे बरोबर सात शिष्य होते पैकी दोन मुख्य शिष्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. सभामंडपा समोरील मंदिरात सदगुरु जालिंदर महाराज गुप्त रूपाने वास्तव्य करत आहेत.
श्री विष्णू मंदिर - श्री कानिफनाथ महाराज श्री विष्णूचे भक्त होते त्यामुळे गादीघराच्या पाठीमागील बाजूस दगडी फरशीवर भव्य अशी भगवान विष्णूची मूर्ती उभी आहे. मूर्तीस चार हात असून शंख, चक्र, गदा व पद्म ही मूर्तीच्या हातामध्ये आहे तसेच दोन्ही पायांच्या बाजूला देवतांच्या प्रतिकृती कोरीव असून दशावताराचे रेखीव चित्र कोरलेले आहे.
हनुमान मंदिर - श्री कानिफनाथ महाराज श्री हनुमंताचेही भक्त होते त्यामुळे ते नित्यनेमाप्रमाणे या सर्व देवतांची पूजा करत असता व त्याचेच एक प्रतिक म्हणून गादीघराच्या दक्षिण बाजूस एक दक्षिण मुखी पेशवेकालीन हनुमंताची पुरातन मूर्ती आहे.
श्री मच्छिंद्रनाथ मंदिर – नाथ संप्रदायाचे पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथांचे येथे छोटेसे मंदिर असून असंख्य भाविकांची श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा या ठिकाणाहूनच पुरी होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर – मुख्य मंदिराच्या पश्चिमेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून तळघरात शिवपिंड आहे. हे मंदिर वास्तूशास्त्राप्रमाणे बांधण्यात आलेले असून सूर्यास्ताचे सूर्यकिरण या पिंडीवर पडते त्याचप्रमाणे याठिकाणी कानिफनाथ महाराज भुयारी मार्गाने गौतमी बारावेमधून स्नान करून आल्यानंतर ध्यान मंदिरातील ध्यान साधनेनंतर बाकी देवीदेवतांची पूजा अर्चा करत.
श्री नवनाथ मंदिर - श्री कानिफनाथ गडावर आलेल्या भाविकांना नवनाथांचे दर्शन घडावे म्हणून मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूस नवनाथ मंदिर बांधण्यात आलेले आहे.
डाळिंब ओटा - एका महिला शिष्येने नाथसंप्रदायामध्ये सामील होणेसाठी नाथांकडे केलेल्या इच्छा पूर्ततेसाठी नाथांनी सांगितलेली तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर ती ज्यावेळेस भ्रमण करत नाथांचा शोध घेत श्री क्षेत्र मढी येथे पोहचली व नाथांनी तिला दिलेले वचन पूर्ण करणे अगोदर नाथांनी समाधी घेतल्याचे समजताच त्या महिला शिष्येने नाथांपुढे डोके आपटून जीव देण्याचे ठरविले हे पाहून नाथ महाराज फाल्गुन अमावस्येला पुन्हा प्रगट झाले व तिला वचन दिले कि जे भाविक तुझ्याकडे इच्छा प्रगट करतील त्यांची मनोकामना पुरी केली जाईल त्यामुळे मढी येथे रंगपंचमीला समाधीदिन व फाल्गुन अमावस्येला प्रगटदिन साजरा केला जातो व त्या घटनेचे प्रतिक म्हणून वर्षानुवर्षे या ओट्यावर डाळिंबाचे झाड फुलत असून भाविकांनी प्रगट केलेल्या इच्छेनुसार इच्छापूर्ती करत आहे. त्यामुळे असंख्य भाविक या झाडाला नवसाचा नाडा बांधतात व नवसपूर्तीनंतर नवसाची फेड करून नाडा सोडतात.
श्री अप्पेश्वर मंदिर - श्री कानिफनाथ गडाचे पूर्वेस पवनागीरी नदीकाठी अप्पाडोह आहे. या ठिकाणी कानिफनाथ महाराजांनी दोन कुंड खोदलेले असून एका कुंडामध्ये थंड व एका कुंडामध्ये गरम पाणी वाहत आहे. याच ठिकाणी महाराज पवित्र स्नान करून महादेवाची पूजा करत होते. या मंदिरास अप्पेश्वर मंदिर असे नाव देण्यात आलेले आहे या पुरातन मंदिराचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिरातील चौथऱ्यावर नंदीची सुबक मूर्ती असून समोर नारदाची मूर्ती आहे. मंदिरातील नंदीच्या कानात भाविकांनी व्यक्त केलेली संकल्पना पुरी झाल्याचे अनेक भाविकांचे वक्तव्य आहे. याठिकाणी नैसर्गिक धबधबा असून येथून सतत पाणी वाहत असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करून स्वतःला धन्यधन्य समजतात.
गौतमी बारव - श्री कानिफनाथ गडाची व मंदिराची उभारणी करणेपूर्वी पाण्याची अडचण सोडवणे साठी मंदिराच्या आग्नेय दिशेला सरदार पिलाजी गायकवाड यांनी भव्य अशा तीन बारवेचे खोदकाम व बांधकाम करून दिलेले असून त्यापैकी एक गौतमी बारव, दुसरी साखर बारव तर तिसरी भांडे बारव आहे. सदर बारवांचे बांधकाम वास्तूशास्त्राप्रमाणे झालेले असून आजही भाविक या पाण्याचा तीर्थ म्हणून वापर करत आहेत.
- पर्यटकांसाठी विशेष - फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते चैत्र शुद्ध प्रतिपदे पर्यंत या ठिकाणी मोठी यात्रा व या कालावधीत नाथपंथीय व आयुर्वेदिक जडीबुटिंची खरेदी विक्री केली जाते. श्री क्षेत्र मढी हे गर्भागीरी पर्वताकाठी असल्याने या भागात हिरवागार डोंगर किनारा असून या डोंगरात अनेक दुर्मिळ पशु पक्षांचे दर्शन घडते. या परिसरात सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने येथे संत्री, मोसंबी, डाळिंब, पपई, चिंचा, चिक्कू, शेतातील ताजा भाजीपाला, दर्जेदार कडधान्य व गुळ रेवडीची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. विशेष म्हणजे या भागात जनावरांची संख्या जास्त असल्याने दही, ताक, पिठलं भाकर, शिंगोरी आमटी व गावरान गव्हाची लापशीचा स्वाद चाखता येतो.
- पर्यटकांसाठी विशेष सूचना द्यायच्या असल्यास - kanifnathsamadhimandirmadhi.com या संकेत स्थळावरून सूचित केले जाते.
- पर्यटन स्थळाशी निगडीत विशिष्ट दिवस - फाल्गुन शुद्ध चतुर्थी, रंगपंचमी, फाल्गुन वद्य अमावस्येचा कावड सोहळा, गुढीपाडवा, श्रीरामनवमी, धर्मनाथबीज, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, श्रीदत्त जयंती, मासिक अमावस्या, विजयादशमी, गोरक्षनाथ प्रकटदिन, श्रावणी शुक्रवार.
- वर्षातील विशिष्ट दिवस जेव्हा इथे वेगळ काही पहावयास मिळते - फाल्गुन शुद्ध चतुर्थी व पंचमीचे निशाण, फाल्गुन वद्य अमावस्येचा कावड सोहळा, मासिक अमावस्येची आध्यात्मिक उर्जा, नाथपूजास्थान, वास्तूशास्त्रानुसारचे ध्यानमंदिर व गर्भागीरी डोंगरातील वनराई.
- तिकीट - ऑनलाईन बुकिंग सुविधा आहे.